लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: अवयवदानाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून नुकतेच मार्च महिन्यामध्ये दोन दिवसांत अवयवादाच्या तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर २२ मार्च रोजी मुंबईत या वर्षातील आठवे अवयवदान यशस्वीरित्या पार पडले. मेंदूमृत व्यक्तीचे यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आल्याने दोघांना जीवदान मिळाले.

मुंबईतील फोर्टिस रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेचा २२ मार्च रोजी मेंदूमृत झाला. यावेळी डॉक्टर, रुग्णालय प्रशासन आणि अवयव दान समन्वय समितीने मेंदूमृत महिलेच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत माहिती दिली. या महिलेच्या नातेवाईकांनी आवर्जून अवयवदान करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करून अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण केली. मेंदूमृत महिलेचे यकृत आणि मूत्रपिंड सुस्थितीत असल्याने ते दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अवयव दानामुळे दोन रुग्णांना जीवनदान मिळाले. ही सर्व प्रक्रिया विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन मेंदूमृत महिलेच्या कुटुंबीयांनी केले.

मुंबईमध्ये नुकतेच ८ आणि ९ मार्च रोजी तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये पार पडलेल्या अवयवदानामुळे अवघ्या ४८ तासांमध्ये १३ अवयव प्रत्यारोपण करण्यात आले. या अवयवदानामुळे एक नवा विक्रम नोंदविला गेला. ८ मार्च रोजी पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, तर ९ मार्चला ग्रँट रोड येथील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि मिरा रोड येथील उमराव वोकहार्ट रुग्णालयामध्ये हे अवयवदान पार पडले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eighth organ donation in mumbai was successful two people got life mumbai print news mrj