शैलजा तिवले

करोनाबाबत गेल्या सात महिन्यांतील अनुभव, कृती दलाचे मार्गदर्शन आणि औषधांची उपलब्धता यामुळे शहरातील गंभीर प्रकृतीचे किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील (व्हेंटिलेटर) जवळपास ८० टक्के रुग्ण बरे होत आहेत. परिणामी मुंबईत दरदिवशी दोन हजारांच्या आसपास करोनाबधित रुग्ण आढळत असले, तरी मृतांच्या प्रमाणात त्या तुलनेत वाढ झालेली नाही, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करताना अनेक संभ्रम होते. वेळोवेळी नियमावलीत बदल करत आता औषधोपचाराचे टप्पे निश्चित झाले आहेत. त्यामुळे अनेक संभ्रम दूर झाले आहेत. आता रुग्ण आला की लक्षणांनुसार लगेचच वर्गीकरण करत औषधोपचारांचे टप्पे ठरविले जातात. परिणामी रुग्णाला योग्य वेळेत योग्य उपचार दिले जात असल्याने कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील जवळपास ८० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे दिसत आहे, असे मृत्यू लेखापरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

पूर्वी असा समज होता की, रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर गेला की प्रकृती ठीक होण्याची संभावना फार कमी असते. मात्र, आजार नवा असला तरी श्वसनच्या आजारांसाठी दिली जाणारी उपचारपद्धती लागू होते, ही बाब अनुभवांती लक्षात आली. त्यामुळे रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता असल्यास तातडीने त्यादृष्टीने उपचार सुरू केले जातात. परिणामी मृत्यूदरही कमी होतो. अगदी सुरुवातीला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांचा मृत्युदर हा १०० टक्के होता. हळूहळू तो ८० टक्क्यांवर आला. गेल्या दोन महिन्यांपासून हा मृत्युदर तुलनेने खूपच कमी झाल्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले.

रेमडेसिवीर औषध हे अत्यंत प्रभावशाली ठरत असून योग्य दिवसांमध्ये दिल्याने मृत्युदर कमी होण्यास नक्कीच मदत होत आहे. तीन ते नऊ दिवसांमध्ये या इंजेक्शनचा डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी रुग्णांनी वेळेत चाचणी करून लक्षणे असल्यास रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. रुग्णांचे योग्य वर्गीकरण करत ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि आवश्यकता असल्यास स्टिरॉईड हे उपचारांचे टप्पे योग्य वेळी पूर्ण केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही, असे करोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

सध्या रेमडेसिवीर उपलब्ध झाल्याने गंभीर प्रकृती झालेल्या बहुतेक रुग्णांना हे नॉन इनव्हॅसिव्ह (मुखपट्टी लावून कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन) यंत्रणेची आवश्यकता भासते. यातील फार कमी रुग्णांना व्हॅसिव्ह (घशात नळी घालून कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन) यंत्रणेवर ठेवण्याची वेळ येते. रेमडेसिवीरमुळे रुग्ण व्हॅसिव्ह यंत्रणेवर जाण्याची शक्यता कमी झाली आहे. परिणामी मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे केईएम रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितले.

२४ ते ४८ तासांत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

रुग्णालयात अनेक दिवस उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ ते ४८ तासांत होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मात्र घट झालेली नाही. भीतीने चाचण्या न करणे, सिटी स्कॅनसारख्या चाचण्या करून घरीच औषधोपचार करणे यामुळे अजूनही रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल होत असल्याने हे मृत्यू होत आहेत. तेव्हा रुग्णांनी चाचण्या करून वेळेत योग्य पद्धतीने उपचार सुरू करणे हाच पर्याय आहे, असे डॉ. अविनाश सुपे यांनी अधोरेखित केले.

Story img Loader