देशातील सर्वात मोठय़ा सहकारी बँकेचा वटवृक्ष गुरुवारी उन्मळून पडला. सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
एकनाथी संस्था
थोर संस्थापुरुष हरपला!
एकनाथ ठाकूर यांना लोकमान्य मातृभूमी पुरस्कार
ठाकूर यांनी २००१मध्ये सारस्वत बँकेचे अध्यक्षपद स्विकारले आणि अखेपर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १३ वर्षांत बँकेने नऊपट व्यवसाय करत ३६ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर थेट दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेशमध्येही बँकेने शिरकाव केला. मात्र बँकेच्या स्थापनेचा शतकी प्रवास पाहण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
२००२ ते २००८ दरम्यान ते शिवसेनेच्या वतीने राज्यसभेचे प्रतिनिधी होते. तरुणांना बँकिंग क्षेत्राकडे आकर्षित करणारी ‘नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग’ची (एनएसबी) मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. ठाकूर यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी ४ पर्यंत प्रभादेवी येथील सारस्वत बँक भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वरळी स्मशानभूमीत संध्याकाळी ५.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.