‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील सर्वच महाविद्यालयांमधील सर्जनशील लेखकांच्या लेखण्या सरसावल्या असतील.. या लेखण्यांतून उत्तमोत्तम नाटय़कृतीही साकारल्या असतील.. सर्वच होतकरू दिग्दर्शकांनी आपापला संच निवडून एकांकिकेच्या तालमीही सुरू केल्या असतील.. या सर्वानाच प्रतीक्षा होती ती स्पर्धेचे प्रवेश अर्ज उपलब्ध होण्याची! बुधवारी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून हे प्रवेश अर्ज लोकसत्ताच्या indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. हे अर्ज पूर्ण भरून १० ते १८ नोव्हेंबर यादरम्यान ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये दाखल करता येतील; तर केंद्रांवरील प्राथमिक फेरी २२ नोव्हेंबरपासून ६ डिसेंबपर्यंत पार पडेल. त्यानंतर ७ ते १४ डिसेंबर यादरम्यान विभागीय अंतिम फेरी रंगेल. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने आणि झी मराठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्वाने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ची महाअंतिम फेरी मुंबई येथे २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
सप्टेंबर महिन्यात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर राज्यातल्या विविध महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ांनी प्रवेश अर्जाच्या चौकशीसाठी ‘लोकसत्ता’ची सर्वच  कार्यालये दणाणून सोडली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवीन संहिता किंवा याआधी कोणत्याही स्पर्धेत सादर न झालेली    
एकांकिका करण्याची अट असल्याने अनेकांनी दिवाळीच्या सुट्टीचा उत्तम वापर केला असेलच! आता या सर्वच नाटकवेडय़ा तरुणांची प्रतीक्षा संपली आहे. या स्पर्धेचे अर्ज बुधवारपासून ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. हे अर्ज डाउनलोड करून ते पूर्ण भरून १० नोव्हेंबरपासून लोकसत्ताच्या विभागीय कार्यालयांत दाखल करायचे आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर असून त्यानंतर आलेले किंवा अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जाबाबतची आणि अर्ज कुठे भरायचे, याबाबतची माहिती ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्याचबरोबर ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’चे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. २२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यभरात रंगणाऱ्या हा एकांकिकांच्या जागरासाठी ‘झी मराठी’ इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून काम करणार आहे. २० डिसेंबर रोजी मुंबईत या स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे.
36

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

अर्ज कुठे उपलब्ध असतील – indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika
नियम व अटी, तसेच अर्ज कुठे सादर करायचे आदी माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekankika competition form loksatta