ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांचे प्रतिपादन
नाटक दोन-तीन अंकी असायलाच हवे या आग्रहापेक्षा भरगच्च ऐवज देणारी एकांकिका ही देखील मराठी रंगभूमीला अधिकाधिक समृद्ध करत असते. एकांकिका हा लेखकाला आव्हान देणारा लेखन प्रकार असून लेखकाने या शक्तीबाबत सजग राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी शनिवारी प्रभादेवी येथे रवींद्र नाटय़ मंदिरात केले. लेखकाने स्वत:ला समृद्ध करण्यासाठी अनेक गोष्टींचे वाचन करावे, विविध कलांचा आस्वाद घ्यावा. कारण जगणे हे लेखकाचे मूलद्रव्य आहे असा विचार त्यांनी नवलेखकांना दिला.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या महाअंतिमफेरीच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एकांकिका म्हणजे दुय्यम लेखन प्रकार आहे. त्याला फारसे महत्त्व नाही, असे समजण्याचे कारण नाही. पन्नास ते साठ मिनिटांच्या अवधीत फार मोठा विषय एकांकिकेतूनही मांडता येऊ शकतो. ते करत असताना कमीत कमी वेळात भरीव ऐवज लेखकाला देता आला पाहिजे. आपण जे आयुष्य जगतो त्या जगण्यातील अनुभव एकांकिका लेखनात व्यक्त झाले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
मी माझ्या आनंदासाठी लिहतो. नाटकाचे खूप प्रयोग करावेत असे मला वाटत नाहीत. नाटक करतच रहावे. ज्यांना पाहायला यायचे आहे ते येतील. लिहिताना आपण काही तडजोडी करायला लागलो तर आपण आपल्या व्रतापासून ढळलो आहोत असे समजावे, असा अनुभव एलकुंचवार यांनी मांडला. नाटकात श्रवणावकाश आणि दृश्यअवकाश समजून घ्यावे लागतात. नाटकात किती अनावश्यक गोष्टी आहेत. हे अनेकदा लेखकाच्या लक्षात येत नाही. संहिता पूर्ण झाल्यानंतर त्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले तर नाटकासाठी जे जे अनावश्यक आहे ते काढून टाकता येते. या अनावश्यक गोष्टींमुळे नाटक असुंदर होते. लेखकापेक्षा अभिनेता हा रंगभूमीचा राजा आहे. संहितेत कापाकापी केली तर ते विराम भरण्याची जबाबदारी अभिनेत्याची असते. लेखकाची संहिताच अशी पाहिजे की, त्या विरामातील अर्थापासून अभिनेत्याला दूर जाता येणार नाही याची काळजी त्याला घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
व्यावसायिक नाटकातला
आनंद हरवला
नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा नाटकाच्या तालीम करण्याच्या काळ हा जास्त आनंद देणारा असतो. सर्वजण काही दिवसांसाठी सगळे मिळून एक अनुभव घेतो. त्याकाळात आपण सर्वजण एकमेकांशी जोडले गेलेलो असतो. त्यामुळे तालमीतला आनंद हा नाटकातला खरा आनंद आहे असे मला वाटते. हल्लीची व्यावसायिक नाटके सफाईदार असली तरी कलाकारांना हा आनंद मिळत नाही आणि त्यामुळे तो प्रेक्षकांपर्यंतही पोहचत नाही.
पन्नास ते साठ मिनिटांच्या अवधीत फार मोठा विषय एकांकिकेतूनही मांडता येऊ शकतो. ते करत असताना कमीत कमी वेळात भरीव ऐवज लेखकाला देता आला पाहिजे. तर लेखकापेक्षा अभिनेता हा रंगभूमीचा राजा आहे. संहितेत कापाकापी केली तर ते विराम भरण्याची जबाबदारी अभिनेत्याची असते.
– महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार