काँग्रेसचे अनुभवी नेते व दोनवेळा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड (वय -७९) यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र त्यांना जारी करण्यात आले आहे.  मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या मिलिंद देवरा यांनी देखील  एकनाथ गायकवाड यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल असे देवरा यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे या निवडीला काँग्रेस अध्यक्षांनी मान्यता दिली असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र अध्यक्षांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तर, मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई काँगेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा अद्याप पक्षाने स्वीकरलेला नसल्याचे समोर आले असले तरी, मिलिंद देवरा हे त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यांनी  पक्ष लवकरच मुंबई काँग्रस अध्यक्षपदाचा निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये काहीसे निराशाजनक वातावरण पहायला मिळत आहे. शिवाय सुरू झालेले राजीनामा सत्र थांबवण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यसमोर ठेवून पक्षाला सज्ज करण्याची जबाबदारी नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या जबाबदारीचा भार एकट्यावर पडू नये आणि सर्वांना न्याय देता यावा, या उद्देशाने थोरात यांच्यासोबत पाच कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. अशाच प्रकारे रचना मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही करावी, अशी इच्छा मिलिंद देवरा यांनी बोलून दाखवली होती.

Story img Loader