भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्माररकासाठी इंदू मिलची जमीन देण्याचे खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केले असताना गेले वर्षभर तांत्रिक घोळ घालण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्या भूमिकेवर काँग्रेसचेच खासदार एकनाथ गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ६ डिसेंबरपूर्वी स्मारकाची अधिकृत घोषणा व्हावी, या मागणीसाठी दिल्लीतच आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषणाला बसण्याची तयारी त्यांनी केली आहे.
इंदू मिलची जागा खासदार गायकवाड यांच्या मतदारसंघात आहे. लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आल्यापासून ते मिलची जमीन आंबेडकर स्मारकासाठी मिळावी यासाठी दिल्लीच्या स्तरावर पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत आहेत. गेल्या माहिन्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काही खासदारांशी स्वंतत्रपणे चर्चा केली होती. त्या वेळीही गायकवाड यांनी इंदू मिल जमीन व आंबेडकर स्मारकाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना सांगितले होते. केंद्रात व राज्यातही काँग्रेसचे सरकार असताना इंदू मिल जमिनीचा प्रश्न न सुटल्याने त्यांनी नापसंतीही व्यक्त केली होती.
इंदू मिल जमीन हस्तांतरण का रखडले आहे, लवकरात लवकर स्मारकाची घोषणा करावी अशी मागणी गेल्याच आठवडय़ात आपण काही खासदारांसमवेत आनंद शर्मा यांची भेट घेऊन केली होती. पण त्यावर संसदेची मान्यता घ्यावी लागेल, अशी उडवाउडवीची उत्तरे शर्मा यांनी दिली, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना त्यांनी हेच सांगितले. महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थितीची त्यांना गांभीर्य नाही, असे गायकवाड म्हणाले. स्मारकाचा मुद्दा रेंगाळल्याने दलित समाजात असंतोष आहे, त्यामुळे इंदू मिलचा प्रश्न सहा डिसेंबरच्या आत मार्गी लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी गोरेगाव येथे शनिवारी झालेल्या काँग्रेस मेळाव्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.
परंतु कोणत्याच स्तरावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आता आपण दिल्लीतच या प्रश्नावर मंगळवारी किंवा बुधवारी उपोषणाला बसणार असे त्यांनी सांगितले.    

Story img Loader