दाऊद दूरध्वनी प्रकरण : सॉफ्टवेअरद्वारे जगातील कोणत्याही क्रमांकावरून कोठेही दूरध्वनी शक्य
तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाते, तसे त्याचे अनेक धोकेही समोर येऊ लागले आहेत. पाकिस्तानातील दाऊदच्या निवासस्थानाच्या क्रमांकावरून मुंबईत बसून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दूरध्वनी करणे सहज शक्य आहे. हा प्रकार कोणत्याही क्रमांकावरून करता येऊ शकतो. यापुढील एक पाऊल म्हणजे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे की, पुरुषाने दूरध्वनी केला तरी समोरच्याला महिलेच्या आवाजात ऐकू येते. दाऊदच्या निवासस्थानातून सातत्याने दूरध्वनी आल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज याचे प्रात्यक्षिकच सादर केले.
खडसे यांनी आरोप फेटाळले असले तरी यातून त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे शक्य असल्याचे समजल्याने खडसे यांनी आपल्या मंत्रालयातील कार्यालयात या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले होते. सर्वासमक्ष या तज्ज्ञाने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे कसे शक्य आहे याचे प्रात्यक्षिकच दाखविले. काही वेबसाइट यासाठीच कार्यान्वित आहेत. या वेबसाइटवर कोणत्या क्रमांकावरून आणि कोणत्या क्रमांकावर दूरध्वनी करायचा याचा पर्याय विचारलेला असतो. उदा. दाऊदच्या पाकिस्तानच्या निवासस्थानाचा क्रमांक दिला आणि कोणाला करायचा या पर्यायावर कोणताही क्रमांक टाकल्यास काही वेळेत दाऊदच्या त्या क्रमांकावरून ज्याचा क्रमांक दिला आहे त्यावर दूरध्वनी येतो. या कंपन्यांचा सव्र्हर इंग्लड किंवा अन्य राष्ट्रांमध्ये असून तेथून हा दूरध्वनी जोडला जातो. मुंबईत बसून दोन मिनिटांमध्ये जगातील कोणत्याही क्रमांकावरून हा दूरध्वनी करणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारेच आपल्याला दाऊदच्या निवासस्थानाच्या क्रमांकावरून दूरध्वनी आले असावेत, असा संशय खडसे यांनी व्यक्त केला. ही सारी माहिती आपण पोलिसांना दिली असून, त्यांनी आता त्याचा छडा लावावा, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा