एकनाथ खडसेंबाबत भाजपमध्ये नाराजी
भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्रिमंडळातून बाहेर राहावे लागल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी जळगावमधील कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाकून नमस्कार केल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. खडसे हे विरोधी पक्षनेते असताना पवारांनी त्यांच्यावर तोडपाण्याचा आरोप केला होता. यामुळे या कृतीद्वारे खडसेंनी आपल्या राजकीय प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.
जळगावमधील जैन उद्योग समूहाच्या कार्यकमात शरद पवार, एकनाथ खडसे यांच्याबरोबरच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार होते. पण, त्यांनी ऐनवेळी कार्यक्रमाला जाणे टाळले. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना अभिवादन करताना वाकून नमस्कार केला. त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली. त्यानंतर भाजपमध्ये खडसे यांच्या या कृतीबाबत नाराजी पसरली. मधल्या काळात जळगावच्या दौऱ्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी खडसे यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांनी खडसे यांच्यावर तोडपाण्याचा आरोप केला होता. आता पवार यांना वाकून नमस्कार करून खडसे नेमका काय संदेश देत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. खडसे यांची राजकीय पत घसरू शकते, असेही एका नेत्याने नमूद केले.
ज्येष्ठांचा सन्मान हा संस्कार : खडसे
‘केवळ मीच शरद पवार यांना वाकून नमस्कार केला असे नव्हे, तर बबनराव लोणीकर, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी पवार यांना वाकून नमस्कार केला, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. वाकून नमस्कार करून ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करायचा असतो, असे संस्कार माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केले आहेत. त्यामुळेच पवार यांना वाकून नमस्कार केला, असे ते म्हणाले.