भ्रष्टाचार खणून काढणे हा गोपनीयतेचा भंग आहे, असे तर्कट लावत राज्यातील भाजप सरकारच्या सहकार खात्याने अकोला जिल्ह्य़ातील एका बाजार समितीच्या सचिवाविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. या समितीत झालेल्या कोटय़वधीच्या गैरव्यवहारात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा पुतण्या हरीश खडसे आरोपी असल्याने सचिवाविरुद्ध हे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
समितीतील भ्रष्टाचारासंदर्भात सचिव राजकुमार माळवे यांनी केलेल्या कारवाईप्रकरणी तत्परतेने गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांनी आता पाच महिने उलटूनही आरोपींना अटक केलेली नाही. तर या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या माळवेंविरुद्ध सरकारी पातळीवरून कारवाईचा फास आवळला जात आहे. माळवे यांनी या प्रकरणाची तक्रार पणन मंडळाकडे किंवा खात्याकडे न करता थेट पोलिसात करून गोपनीयता कायद्याचा भंग केला, अशी तक्रार आरोपी हिंगणकर व हरीश खडसे यांनी शासनाकडे जानेवारीत केली. भ्रष्टाचाराच्या संदर्भात माळवेंनी पाठवलेल्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या भाजप सरकारने या आरोपींनी केलेल्या तक्रारीची मात्र तातडीने दखल घेतली व माळवेंची विभागीय चौकशी करा, असे आदेश पणन मंडळाला दिले. त्यानुसार मंडळाने अकोल्याच्या जिल्हा उपनिबंधकांकडे ही चौकशी सोपविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse nephew