स्वीय सहायकाच्या आणि विशेष कार्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी नाकारल्याने संतप्त झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला, तर शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र तातडीने थांबवा, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. राज्यमंत्र्यांना अधिकारच नसल्याचे सांगत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता मंत्रिमंडळात ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली आहे.
सरकारी कर्मचारी असलेल्या खडसे यांच्या कार्यालयातील या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात पाठविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत, असे सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्याआधीच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तरीही हे कर्मचारी खडसे यांच्या कार्यालयात काम करीत आहेत. याआधी २० डिसेंबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्यानंतर या घडामोडी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जीआरनुसार कार्यवाही करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम राहिल्याने, मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारून मंगळवारी दिवसभर मुंबईतच बंगल्यावर आराम करणे खडसे यांनी पसंत केले. खडसे यांचा मोबाइल दिवसभर बंदच होता, तर आराम करीत आहेत, असे त्यांच्या शासकीय निवासस्थानातून सांगण्यात आले.
आधीच सत्ताधारी युतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र सध्या उभे राहिले आहे. त्यातच आता, १ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशामुळे भारतीय जनता पक्षाअंतर्गतही कुरबुरी वाढू लागल्या असल्याचे समोर येत आहे.
राज्यमंत्र्यांना अधिकार द्या
राज्यमंत्र्यांना अधिकार नसल्याबद्दल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत तातडीने पावले टाकली न गेल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागेल, असा इशाराच वायकर यांनी दिला.
शेतकरी आत्महत्या रोखण्याची मागणी
राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चार हजार कोटी रुपये दिले आहेत. तरीही विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा मुद्दा दिवाकर रावते यांनी काढला. आणखी पॅकेज द्यावे, पण या आत्महत्या रोखाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर याबाबत सरकार गंभीर असून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या खडसे आणि मुख्यमंत्री यांच्यात महसूल विभागातील कार्यालयातील नियुक्त्यांवरून वाद भडकला आहे. खडसे यांचे खासगी सचिव शांताराम भोई, विशेष कार्य अधिकारी मिलिंद हरदास आणि व्ही. टी. माने यांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी परवानगी नाकारली.