तब्येत बरी नसल्यामुळे मंत्रिमंडळ आपण कालच्या मंत्रिमंडळ बैठकीस हजर राहू शकलो नाही, असा खुलासा आज महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलात आणलेल्या नियुक्तयांच्या धोरणावर नाराज असल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीस हजेरी लावली नाही, या बातमीचा स्पष्ट इन्कार करून, आपल्या नाराजीच्या बातम्या प्रसिध्दीमाध्यमांमधून जाणीवपूर्वक पसरविल्या जातात, असे ते म्हणाले. 

गेल्या १० वर्षांत आधीच्या सरकारच्या मंत्र्यांकडे स्वीय सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देऊ नये, असा शासन निर्णय १ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. तरीही खडसे यांच्यासह बहुसंख्य मंत्र्यांकडेही आधीच्या मंत्र्यांकडे असलेले अधिकारी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयातही अशा तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पण केवळ खडसे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला परवानगी देण्यास नकार देत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिपत्याखालील सामान्य प्रशासन विभागाने या कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठविले.

त्यामुळे खडसे हे नाराज असून ते मंत्रिमंडळ बैठकीस मंगळवारी अनुपस्थित राहिल्याने खळबळ माजली आहे. मात्र खडसे यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगितले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्य़ाद्री अतिथीगृहावरील स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमास आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या परिषदेस खडसे हजर राहिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही खडसे यांच्या नाराजीबाबत बोलण्याचे टाळले. पण मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यातील नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.