मुंबई : भाजप नेत्यांच्या विधानांवरून राजकीय गोंधळाची मालिका सुरूच असून आता भाजपचे ज्येष्ठ व नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या विधानावरून गोंधळ उडाला आहे. कोणावरही एकाच पक्षाचा शिक्का असत नाही, असे विधान खडसे यांनी केल्यानंतर ते भाजप सोडणार की काय अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ते विधान कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना उद्देशून होते, त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असा खुलासा करत भाजप सोडण्याचा विषय नसल्याचे स्पष्टीकरण खडसे यांनी केले.

भाजपची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने खडसे नाराज झाले होते.  २०१६ मध्ये मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यापासून खडसे नाराजी वाढली. भुसावळमधील लेवा पाटीदार समाजाच्या  कार्यक्रमात खडसे यांनी, कोणावरही एका पक्षाचा शिक्का कायमचा असत नाही, असे विधान केले.  खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, भाजप सोडण्याबाबतचे विधान केलेले नाही. कार्यक्रमात कॉंग्रेसचे  नेते होते. त्यांनी पुन्हा पक्षात येण्याविषयी भाष्य केले होते. त्याचा धागा पकडून तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही, असे सांगत पूर्वी दुसऱ्या पक्षात असलेल्या कॉंग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना उद्देशून एका पक्षाचा शिक्का असत नाही, असे विधान केले.  त्याचा विपर्यास केला , असे खडसे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader