मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्यामुळे नाराज असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आपली नाराजी उघड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आम्ही सारे एकमेकांसोबतच आहोत हे खडसे कितीही जाहीरपणे सांगत असले तरी त्यांचे ‘एकच लक्ष्य’ मुख्यमंत्री फडणवीस हे आहेत. फडणवीस आपल्याच पठडीत तयार झाले, असे खडसे स्वतच सांगत असल्याने, फडणवीस हे सुद्धा कच्च्या गुरूचे चेले नाहीत, हेही स्पष्टच आहे. वेळ आल्यावर टोचून परतफेड करण्याची संधी फडणवीसही सोडत नाही हे आज बघायला मिळाले. शेतकऱ्यांच्या मदतीवरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी आपल्या विभागाने किती काम केले याची जंत्री सांगण्यास सुरुवात केली. ९० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्नात असतानाच शेजारी बसलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसे यांची आकडेवारी खोडून काढली. ७८ टक्केच शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी बसून सांगितले तरी ते साऱ्या सभागृहाला ऐकू गेले. कितीही संयम पाळायचा ठरविले तरी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांनी बसून केलेले विधान बरेच लागलेले दिसले. आपण शेतकरी नाही किंवा शेतीतील काही कळत नाही, अशी काही जण आपल्यावर टीका करतात. पण आपण बुवा असे आहोत, असे सांगत, आपल्याला कुठे ओबामा यांना भेटायला जायचे आहे, असा शालजोडीतील शेलका सवाल खडसे यांनी टाकला. हा सरळसरळ मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशूनच टोला होता. (ओबामा यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे मिळाले नव्हते) आमदार निधीवरून भाजपचे आमदार आपले ऐकतील कारण मी त्यांचा नेता आहे, हे सांगत पक्षावर आपला प्रभाव असल्याचे चित्रही खडसे यांनी रंगविले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2015 रोजी प्रकाशित
खडसेंच्या आकडेवारीला फडणवीसांचा ‘खो’!..
मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्यामुळे नाराज असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आपली नाराजी उघड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आम्ही सारे एकमेकांसोबतच आहोत हे खडसे कितीही जाहीरपणे सांगत असले तरी त्यांचे ‘एकच लक्ष्य’ मुख्यमंत्री फडणवीस हे आहेत.

First published on: 12-03-2015 at 04:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse statistic troubles cm fadnavis