मी शेतक-याचा मुलगा आहे. जन्मापासून मी शेतात राहिलो आहे, शेतीत राबलो आहे, त्यामुळे ज्यांनी कधी शेती पाहिलेली नाही, केली नाही. त्यांनी मला शेतीतलं शिकवू नये, असं प्रत्युत्तर महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी उध्दव ठाकरेंना दिलं आहे. मोबाइल बिल भरता, मग वीजबिल का भरत नाही, असे वक्तव्य सोमवारी खडसे यांनी केलं होतं. त्यानंतर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव आता खडसेंनी केली. शेतकऱ्यांनी मोबाईल बिलाचे पैसे वाचवून ते वीजेसाठी वापरावे, असा खुलासा खडसेंनी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत केला.
ज्यांना भूईमुग जमिनीखाली उगवतो की जमिनीवर हे माहित नाही, त्यांनी यावर प्रतिक्रिया देऊ नये असा टोलाही खडसेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच त्यांनी कुणाशी माझी तुलना करावी हा त्यांचा प्रश्न असल्याचंही ते पुढे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

..तर राष्ट्रवादीपेक्षाही भाजपची अवस्था वाईट

अजित पवार व खडसे यांच्यात काय ‘फरक’ असे विचारताना ‘मेहनतीने सरकार मिळाले आहे. ते नीट चालवावे अन्यथा राष्ट्रवादीपेक्षाही भाजपची अवस्था वाईट होईल,’ असा चिमटा लोहा येथे उध्दव ठाकरे यांनी काढला होता. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

टंचाईग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं परीक्षाशुल्कही माफ करणार असल्याची घोषणा खडसेंनी केली. या भागात मनरेगाचं सूत्र बदलणार असून ४९% मशीनरी आणि ५१% मजूर हे सूत्र यापुढे असणार आहे. चा-याच्या पाण्याची टंचाई असणा-या भागात ‘वैरण विकास कार्यक्रम’ राबवणार असल्याचंही ते म्हणाले. फळ बागांसाठी हेक्टरी ३५,००० हजार मदत देणार असल्याचे सांगत ही मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादित असणार असल्याचे त्यांनी म्हटले.  

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse takes u turn on power bill statement