मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आदी विकास प्राधिकरणांच्या बुधवारी घेतलेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या कारणांवरून मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी ही बैठक आयोजित केली होती. परंतु शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
उद्योग खात्यातील अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेतले जात असल्याने मंत्री उदय सामंत यांनी खात्याचे प्रधान सचिव आणि ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री म्हणून आपल्या अधिकारांवर गदा येत असून महत्त्वाच्या बाबी व निर्णयाबाबतचे प्रस्ताव आपल्या संमतीसाठी ठेवावेत, अशा सूचना सामंत यांनी दिल्या आहेत. तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना अंधारात ठेवून व त्यांच्याकडे कार्यभार न देता एसटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे देण्यात आला आहे. यासह अन्य मुद्द्यांवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतच नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेनेकडे असलेल्या उद्योग, नगरविकास, परिवहन आदी खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याशी संबंधित बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संबंधित मंत्री, पालकमंत्री या बैठकांना उपस्थित होते.
पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अनुपस्थित
शहरांशी संबंधित विकास प्राधिकरणे नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतात आणि एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री असल्याने त्यांची उपस्थिती आवश्यक होती. या बैठकीबाबतचा निरोप त्यांना मंगळवारी दुपारी मिळाला. परंतु आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकांना अनुपस्थित राहिले. या बैठकांना न जाता शिंदे कल्याणजवळील मलंगगड उत्सवास उपस्थित राहिले.
येरवडा-कात्रज भुयारी मार्ग
पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिले. प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी सुमारे ६३७ कोटी रुपये, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करिता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी एक हजार ५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे – नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाला चांगली ‘ वाहतूक व्यवस्था ( कनेक्टिव्हिटी) ‘ तयार करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. नवीन शहर नियोजन करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करण्यात यावेत. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे व ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात, आदी सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.