Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही गणपतीची आरती केली आणि त्यानंतर गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर त्यांचा नातू होता. आजोबांसाठी नातू म्हणजे दुधावरची साय याचाच प्रत्यय यावेळी उपस्थितांना आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नातवासह असलेले फोटो व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या धडाडीसाठी आणि लोकांमध्ये उतरून काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गणपतीची आरती करताना त्यांच्यातले आजोबा महाराष्ट्राने पाहिले. गणपतीची आरती करताना त्यांच्या खांद्यावर त्यांचा नातू रूद्रांश त्यांच्या खांद्यावर बसला होता. त्यानेही आजोबांसह गणपतीची पूजा केली. या प्रसंगाचे फोटो व्हायरल झाले आहेत. श्रीकांत शिंदे आणि वृषाली शिंदे यांचं लग्न २०१६ मध्ये झालं आहे. रूद्रांश हा श्रीकांत शिंदेंचा मुलगा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नातू आहे. एकनाथ शिंदे आणि रूद्रांश यांचे हे खास फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.
रूद्रांश एकनाथ शिंदेंचा लाडका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली आणि मुलगा रूद्रांश या सगळ्यांनी नुकतंच लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं होतं. त्यावेळीही त्यांचे फोटो चर्चेत आले होते. तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं त्यावेळीही त्यांनी रूद्रांश बरोबर माझा वेळ खूप छान जातो. त्याच्या बरोबर वेळ घालवला की थकवा निघून जातो असं म्हटलं होतं. आता गणपतीच्या निमित्ताने नातू रूद्रांशने आजोबा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बसत आरतीत सहभाग घेतला. या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे पण वाचा- Ganesh Visarjan 2024 Live : लालबागच्या राजासह, गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी
गणेश उत्सवात राजकारण नाही
विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये पार पडेल असं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं. गणेश उत्सवात सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण दिसून येतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगलाही सजलेला असतो. भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांचीही उपस्थिती असते. राजकारण बाजूला ठेवून गणरायाच्या भक्तीत महाराष्ट्र तल्लीन झालेला दिसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेश उत्सवात गणपतीची मनोभावे सेवा केली असं त्यांनीच सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“ १० दिवस सर्व लोकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. राज्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. भाविकांनी गणरायाची मनोभावे सेवा केली. आता गणपती बाप्पााला निरोप देताना गणपती बाप्पा पुन्हा लवकर या, अशी भावना सर्वांचीच असते. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाचा महाराष्ट्राच्या जनतेवर आशीर्वाद राहवा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसंच आरती केल्यानंतर वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.