मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. यानुसार करोना काळात रोखलेली मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ आणखी एक वर्षे पुढे ढकलली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना सूचना दिल्याचंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं. यावेळी त्यांनी आशिष शेलारांसह अनेक आमदारांनी भेट घेऊन मागणी केल्याचंही सांगितलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईत मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ करोना काळात पुढे ढकलली होती. आता ती वाढ होणार होती. परंतु मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त चहल यांना वाढ न करण्याबाबत सांगितलं आहे.”
“आयुक्तांना आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ न करण्याच्या सूचना दिल्या”
“आशिष शेलार, अतुल भातखळकर, सदा सरवणकर, यामिनी जाधव, कुडाळकर, सुनिल राणे, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, अमित साटम इत्यादी आमदारांनी मला भेटून १६ ते २० टक्के वाढ करू नये अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मी आयुक्तांना आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ न करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध झालेले दिसले. कुणी आक्रमक टीका केली, तर कुणी खोचक टोले लगावत प्रत्युत्तर दिलं.
“तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”
एकनाथ शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकेरेंचे आशीर्वाद आहेत आणि आनंद दिघेंवर आमची श्रद्धा आहे.”
“अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात”
“तुमचं वागणं, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? मी झोपतोच पहाटे चार वाजता. तुमच्याबद्दल मला आदरही आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “आम्ही श्रद्ध सबुरीनेच काम करतो आहे. तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली. तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंत पाटील यावर हसत आहेत. मला आठवतंय, जयंत पाटील म्हणाले म्हणाले होती की, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यामुळे अजित पवारांनी थोडी घाई केली.”
पाहा व्हिडीओ –
“…तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला”
“पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे. तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. मी त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“मला वाटलं जयंत पाटील देखील तेथे आहेत, मात्र…”
“अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मला वाटलं जयंत पाटील देखील तेथे आहेत. मात्र, जयंत पाटील तेथे नव्हते. ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. ओके झाला असता,” असंही शिंदेंनी नमूद केलं.