खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. स्वतः कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या समोर याची माहिती देत मान्य केलेल्या १५ मागण्यांची घोषणा केली. तसेच संभाजीराजेंनी केलेल्या मागण्यांपेक्षा अधिक मुद्दे समाविष्ट करत मागण्या मान्य केल्याचंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ते मुंबई आझाद मैदानावर उपोषणस्थळी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाश शिंदे म्हणाले, “मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात प्राणांतिक उपोषणाला बसलेले खासदार व मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांची महाविकास आघाडीतील सहकारी असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री अमित देशमुख यांच्यासह भेट घेतली. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवत त्यांनी उपोषण मागे घेण्यास अनुमती देऊन ते मागे घेतले.”

ठाकरे सरकारने मान्य केलेल्या १५ मागण्या खालीलप्रमाणे,

१. सारथीचे कौशल्यविकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येतील.

२. सारथीचं व्हिजीन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत पूर्ण तयार करण्यात येईल.

३. सारथीमधील सर्व रिक्त पदं १५ मार्च २०२२ पर्यंत भरण्यात येतील.

४. सारथीच्या ८ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्च २०२२ पर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल.

५. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात १०० कोटीपैकी ८० कोटी प्राप्त झालेत. उर्वरित २० कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

६. व्याजपरताव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव प्राप्त झाल्यास तातडीने व्याजपरतावा देण्यात येईल. कर्ज मिळण्यात ज्या अडचणी येत आहेत त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

७. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्जावरील व्याज परताव्याबाबत शासन धोरण ठरवेल.

८. व्याज परताव्यासाठी कर्जाची मुदत १० लाख होती, ती आता सरकारने १५ लाख रुपये केली आहे.

९. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर महामंडळावर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक १५ मार्च २०२२ पर्यंत नियुक्त करण्यात येईल. तसेच संचालक मंडळ आणि इतर कर्मचारी देखील नियुक्त केलं जाईल.

१०. जिल्ह्यात स्थापन करावयाच्या वसतिगृहांची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आजच उपलब्ध करून तयार वसतिगृहांचं उदघाटन गुडीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल.

११. कोपर्डी खून खटल्यात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत महाधिवक्त यांना विनंती करून २ मार्च २०२२ रोजी मेंशन करण्यात येईल.

१२. पुनर्विचार याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्याबाबत १५ दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात येईल.

१३. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबत गृहमंत्रालयाकडून प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल. त्यात प्रकरणनिहाय आढावा घेण्यात येईल. तसेच जे गुन्हे मागे घेण्यात आलेत परंतू न्यायालयात आहेत त्याचाही प्रकरणनिहाय आढावा घेण्यात येईल.

१४. मराठा आंदोलनात मृत पावलेल्या वारसदारांना एसटी महामंडळात ११ लोकांना नोकऱ्या मिळाल्यात. उर्वरित लोकांना तातडीने कागदपत्रांची पुर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

१५. अधिसंख्य पदं निर्माण करून त्यांच्या नियुक्तीबाबचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी तुम्ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. तुमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राला काळजी आहे, असंही मत व्यक्त केलं.

सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर संभाजीराजे म्हणाले…

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “माझ्या चेहऱ्यावर देखील आत्ता हास्य आलं. मी देखील फार खूश आहे. मलाही पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. मी इथं उपस्थित असलेल्या आणि इथं नसताना कायम पाठिंबा देणाऱ्या सर्व मराठा संघटनांचे आभार मानतो. हे सर्व मला २००७ पासून पाठिंबा देत आहेत. या सर्व संघटनांनी दाखवून दिलं की हा खऱ्या अर्थाने शाहूंचा वंशज आहे. राजे तुम्ही फक्त कोल्हापूरसाठी मर्यादित राहायचं नाही, तर महाराष्ट्र आणि देशापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव नेण्याची तुमची जबाबदारी आहे असं या संघटनांनी सांगितलं.”

“अनेक लोकांनी मी खासदार झाल्यावर टीका केली, पण माझी पूर्ण खासदारकी समाजासाठी आणि अनेक विकासाच्या कामांसाठी लावली. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी लावली. इतिहासात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संसदेत कोणीही विषय मांडला नव्हता. मी संसदेत सुरुवात केली. त्यानंतर अनेक खासदारांनी त्यांचा अभ्यास नसला तरी त्यांच्या त्यांच्या परीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांचेही आभार,” असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

“उपोषणाचा निर्णय घरी सांगण्याचं माझं धाडस झालं नाही”

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “आमरण उपोषण हा माझ्यासाठी ऐतिहासिक निर्णय होता. मी घरच्यांना विचारलं नाही. संयोगिताराजे आणि शहाजी यांना हा निर्णय सांगण्याचं माझं धाडस झालं नाही. त्यांनी बरोबर समन्वयकांकडून माहिती काढली. मी माझ्या वडिलांना छत्रपती शाहू महाराज आणि आईला देखील हा निर्णय सांगितला नाही. तुम्हाला पटणार नाही, पण आज तुम्हाला घरातली आतली गोष्ट सांगतो. ज्या दिवशी मी आमरण उपोषण करणार असं जाहीर केलं तेव्हा माझ्या वडिलांना फोन करण्याचंही माझं धाडस नव्हतं.”

“वडील म्हणाले, माझ्या आशीर्वादाची काय गरज…”

“वडील असल्याने त्यांनी मी चुकीचा निर्णय घेतला असंच म्हटले असते. म्हणून मी त्यांना सांगितलं नाही. मी त्यांच्याशी १०-१२ दिवस बोललो नाही. वडील असल्याने आदरयुक्त भीती असणारच, त्यामुळे अखेर आंदोलनाच्या दिवशी मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला माझ्या आशीर्वादाची काय गरज, तुम्हाला तर महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे असं म्हटलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

“माझी पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला”

“माझी पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केलाय. त्या दररोज दिवसभर थांबायच्या आणि नंतर झोपायला जायच्या. मी नकळत त्यांच्याकडून दररोज खाण्याची आणि फिट राहण्याची शपथ घेतली होती. मला म्हटल्या शपथ घ्यायची नाही. त्यांनी देखील माझ्यासोबत उपोषण केलं. त्यांनी देखील अन्नत्याग केला होता हे मलाही माहिती नव्हतं. त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानतो,” असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde announce sambhajiraje chhatrapati demands which government agree to fulfill pbs