मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्यात येत आहेत. नागरिकांचा म्हाडावरील विश्वास वाढत आहे. आता याच म्हाडाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार, डबेवाले यांना हक्काचा निवारा देण्याच्यादृष्टीने गृहनिर्मिती केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासित केले. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ३,६६२ घरांच्या सोडतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे मंडळाच्या ३,३६२ घरांसाठी बुधवारी दुपारी २ वाजता शिंदे आणि उपमुख्यमंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ९३ घरांसह २० टक्के योजनेतील पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर विकास प्रााधिकरण हद्दीतील ३,५६९ घरांसाठी १० ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया राबविण्यात आली होती. विहित मुदतीत ३,६६२ घरांसाठी ७१ हजार ६४२ अर्ज पात्र ठरले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी दुपारी २ वाजता सोडतीचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून, तर अजित पवार मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. म्हाडावर लोकांचा विश्वास वाढत असून म्हाडाने अधिकाधिक नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. महायुती सरकारही सर्वांना हक्काचे घर देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच म्हाडाने घराचा ताबा लवकरात लवकरच देण्याकडे भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी म्हाडाला दिले.
राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. या गृहनिर्माण धोरणाद्वारे सर्वसामान्यांना अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करण्याचे मुख्य उद्दीष्ट राज्य सरकारचे आहे, असे एकनाश शिंदे यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांना हक्काचा निवारा देण्याच्यादष्टीनेही गृहनिर्माण धोरणावर भर देण्यात आल्याचेही ते म्हणाले. म्हाडाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळतो, यावरून म्हाडावर नागरिकांचा विश्वास वाढत आहे. पण म्हाडाने ताबा वेळेत द्यावा. तसेच घरांच्या बांधकामाच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करू नये, असेही ते म्हणाले. मुंबईत झोपडपट्टी पुनर्वनस योजनेचे रखडलेले प्रकल्प विविध सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुण्यातही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.