मुंबईतील ४०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार कोटी रुपयांचं कंत्राट महापालिकेने काढलं आहे. पण, या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंनी केला होता. या आरोपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांची दुकानं बंद होतील. त्यामुळे दु:ख होत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४० हजार कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन झालं. तेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४०० किलोमीटर रस्त्यांचं भूमिपूजन होतं आहे. पुढच्या महिन्यात आणखी ५०० किलोमीटर रस्ते क्राँक्रिटचे करत आहोत. पुढील दोन-अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होत लोकांचा जीवन सुसह्य होईल. मात्र, यालाही खोडा घालण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यांना त्यांचं काम करुद्या, आपण आपलं काम करु,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा : “काही लोकांनी बेईमानी केली, त्यामुळे…”, फडणवीसांचं मोदींसमोर शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य, म्हणाले…
“दरवर्षी खड्ड्यातून प्रवास, लोकांचे गेलेले बळी आणि लोकांचा पैसा वाचवण्याचं काम आम्ही काँक्रिट रस्त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. २० ते २५ वर्षे डांबराच्या रस्त्यांचं दुरुस्तीचे पैसे वाचणार आहेत. हे लोकांना हवं आहे, पण काहींना नको आहे. कारण, २५ ते ३० वर्षे रस्त्याला खड्डा पडणार नाही. त्यामुळे डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांची दुकानं बंद होतील. हे दु:ख आहे,” असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.