मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या जाहीर आव्हानानंतर थेट वरळीत सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या अनेक आरोपांना प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदेंनी मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार या विरोधकांच्या आरोपांवरही भाष्य केलं. तसेच कोळीवाड्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामांचीही माहिती दिली. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) वरळीतील सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोकं काय काय बोलत असतात. मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि मुंबईकरांचं काय होणार असे जावईशोध हे लोक मुंबईची प्रत्येक निवडणूक आल्यावर लावतात. परंतु हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई महाराष्ट्राची एक इंचही जागा कोणाला घेता येणार नाही आणि घेऊ देणार नाही.”

“काही लोक म्हणाले की, यायचं तर वरळीतून येऊन दाखवा, हा एकनाथ शिंदे एकटाच…”

“जे जायला पाहिजे होतं, जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यांपूर्वीच घालून टाकलं. याचे आपण साक्षीदार आहात. त्यावेळचा काळ मला आठवतो. आम्ही गुवाहटीला होतो. काही लोक म्हणाले की, यायचं तर वरळीतून येऊन दाखवा, वरळीतून जाऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे एकटाच आला आणि हेलिकॉप्टरने न जाता इथून रोडने गेला. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलोय,” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं, दिलं आणखी एक खुलं आव्हान; म्हणाले, “मी तुमच्यासमोर…”

“डोक्यात सत्तेची हवा होती त्यांनी हुकुमशाही पद्धतीने कोळी बांधवांची मागणी फेटाळली”

एकनाथ शिंदेंनी कोळीवाड्याच्या प्रश्नांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मागील सरकारमध्ये ज्यांच्या डोक्यात सत्तेची हवा होती त्यांनी हुकुमशाही पद्धतीने कोळी बांधवांची दोन खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी फेटाळली. त्यानंतर सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार राज्यात आलं. त्यानंतर किरण पावसकर आमच्याकडे हा मुद्दा घेऊ आले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली बैठक घेतली आणि कोळी बांधवांची मागणी मान्य केली.”

हेही वाचा : “देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे…” ठाकरे गटाचे प्रत्युत्तर!

“म्हटलं व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही कोळी बांधवांसाठी…”

“या सरकारने गेल्या सहा महिन्यात या अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेतले. आम्ही पहिल्या दिवसापासून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. म्हटलं व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही कोळी बांधवांसाठी दोन खांबांमध्ये १२० मीटर अंतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.