शिवसेनेच्या ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अटक केली. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दळवींना अटकेनंतर खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातही ‘गद्दार हृदयसम्राट’ असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी खालच्या भाषेतील टीका किती काळ सहन करणार, असा प्रश्न शिंदेंना विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी माझं काम करतो. आम्ही सरकार म्हणून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करतो. ते बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती विसरले आहेत. ते बाळासाहेबांचे शिकवण विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आरोप करणं, खालच्या पातळीवरील भाषा वापरणं हा त्यांचा एककल्ली कार्यक्रम आहे. ते आमच्या संस्कृतीत नाही.”

“फेसबूक लाईव्हद्वारे काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवू नये”

“या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, परंपरा आहे. जे घरात बसून फेसबूक लाईव्हद्वारे काम करत होते त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवू नये,” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

“त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल खुद्द शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलं”

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल खुद्द शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही.”

हेही वाचा : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदेंवर…”

“मी एवढंच सांगू इच्छितो की, हे सरकार…”

“मी एवढंच सांगू इच्छितो की, हे सरकार काम करणारं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आहे. घोषणा करून फसवणारं नाही. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आम्ही पूर्ण केल्या. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला, मात्र पैसे देण्याचं काम आम्ही केलं,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde comment on verbal abuse datta dalvi uddhav thackeray pbs
Show comments