मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर सत्रात जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यामागे कशा घडामोडी घडल्या आणि यात मुख्य भूमिका कुणाची होती याविषयी अनेक मोठे खुलासे केले. यातील एक मोठा खुलासा म्हणजे या सर्व सत्तांतर नाट्यामागे देवेंद्र फडणवीसच होते हे एकनाथ शिंदे यांनी कबुल केलं. त्यामुळे मविआ सरकारच्या अस्थितरतेत आमची कोणतीही भूमिका नाही असा दावा करणाऱ्या भाजपाची कोंडी झालेली पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी तर शिंदेंच्या भाषणात डोक्यालाच हात लावला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं, गुरुवर्य आनंद दिघे यांचे आशीर्वाद आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची संख्या कमी असताना पंतप्रधान मोदींनी याला आशीर्वाद दिला. शपथ घेण्याआधी मोदी मला म्हणाले, ‘एकनाथजी अच्छा काम करो. यह राज्य को आगे बढाओ. इस राज्य को प्रगतीपथ पर ले जाओ. आपको किसी चिज की कमी हम होने नही देंगे.'”
“खरं आहे ते बोलायला देखील हिंमत लागते”
“अमित शाह म्हणाले, ‘हम लोग तो पुराने मित्र हैं. शिवसेना भाजपा युती पहलेसे हैं. आप चिंता मत किजीए. आपके पिछे हम चट्टान की तरह खडे हैं’,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप केल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, भास्कर जाधव खरं आहे ते बोलायला देखील हिंमत लागते. यावर भास्कर जाधव यांनी आज अलगच बहार आहे म्हटलं. त्यावर शिंदेंनी ‘यह अंदरकी आवाज हैं’ म्हटलं.”
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठे कलाकार देवेंद्र फडणवीस आहेत”
“भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हेही पाठिशी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठे कलाकार देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही केव्हा भेटायचो हे आमच्या लोकांनाही कळायचं नाही. ते सगळे झोपल्यावर मी जायचो. सगळे उठण्याआधी मी परत यायचो,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
“सगळं घडवणारे देवेंद्र फडणवीस, कधी काय काय करतील माहिती नाही”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “जयंत पाटील तुम्ही काळजी करू नका. आपण इकडे तिकडे येऊ शकतो. सगळं घडवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. कधी काय काय करतील माहिती नाही. राज्यसभेचे शिवसेनेचे दोन उमेदवार होते. आमचे दोन्ही निवडून येणार होते. पूर्ण तयारी केली होती. बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही ४२ मतंच घेतो. मात्र, त्यांनी ४४ मतं घेतली. अजित पवारांनी ४३ घेतली, एकच जास्त घेतलं. म्हटलं एवढं होऊनही आपली जागा येऊ शकते. बघितलं तर आमचा दुसरा माणूस पडला.”
“इकडे कलाकार बसलेत, त्यांनी कुणाचे फोडले काही माहिती नाही”
“हा माणूस कसा पडला हे तपासलं. आमची सर्व मतं एकत्र होती. सुनिल प्रभु आणि इतर आमचे हुशार लोक होते. त्यांनी मतांची तपासणी केली. मग म्हटलं मतं कुणाची फुटली. इकडे कलाकार बसलेत. यांनी कुणाचे फोडले काही माहितीच नाही. बाकी लोक म्हटले अरे पडला तो वेगळा पडला, तो दुसरा पडला पाहिजे होता. मी म्हटलं असं नाही, पण मी म्हटलं दोन्ही खासदार निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होतं. ते सगळं गणित आमच्याकडे होतं,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची विधानसभेत प्रतिक्रिया; म्हणाले, “खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी…”
“फडणवीस हात जोडून मिश्किलपणे म्हणाले सगळं उघडं करू नका”
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे राजकीय घडामोडींनबाबत इतकी नवनवीन माहिती देत होते की या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी हात जोडून मिश्किलपणे एकनाथ शिंदेंना सगळं उघडं करू नका, अशी विनंती केली.