ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत असेल तर माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंच्या याच आव्हानावर आता एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत भाष्य केले आहे. मी अशी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हानं स्वीकारतो. अशी आव्हानं स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे. सहा महिन्यांपूर्वी मी असेच एक आव्हान स्वीकारले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते वरळी येथे जाहीर सभेत बोलत होते.
हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”
“आम्ही तेव्हा गुवाहाटीमध्ये होतो. काही लोक म्हणाले यायचं तर वरळीतू येऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे अगोदर एकटाच आला. त्यानंतर हेलिकॉप्टरने न जाता वरळीतून रस्त्याने गेला. कारण आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहोत. आम्हाला आयतं मिळालेले नाही. आम्ही मेहनत केलेली आहे. शाखाप्रमुखापासून मी काम केलेले आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत आलोले आहोत. आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तुम्ही कोणाला आव्हान देता. ही आव्हानं पेलत पेलतंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही लोकांच्या मनातील सरकारची स्थापना केलेली आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>> नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्र, वरळी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले; “हिंमत नसेल तर…”
“काही लोक सकाळी उठले की गद्दार आणि खोके असे शब्द वापरतात. या शब्दांशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही. मी त्याच्यावर भाष्य करत नाहीत. काही लोक आव्हान देत आहेत. पण मी माझ्या सहकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की, एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हानं स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं,” असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता दिले.