मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. मुंबई मेट्रोचा श्रेयवाद चुलीत घाला. आम्हाला लोकांना सुविधा द्यायच्या आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी हल्ला चढवला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “बरेच पत्रकार अजित पवार यांना आणि मलाही भेटले. ते श्रेयवादाचं काय असं विचारत आहेत. श्रेयवाद घाला चुलीत. आम्हाला लोकांना सुविधा द्यायच्या आहेत. आम्हाला लोकांना त्या मेट्रोत बसून आनंद घेताना बघायचं आहे. आम्हाला त्यात कसलं क्रेडिट घ्यायचं आहे. ही काय कोणाची मक्तेदारी नसते. या मेट्रोचं काम पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सुरू झालं. नंतर भूमिपूजन झालं. त्यानंतर आता उद्घाटन झालं.”
विलास देशमुखांचं नाव घेत मुंबई मेट्रोवरून एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी
“ठाण्यात आमचं सीएमआरडीसीच्या पीडब्ल्यूडीच्या पुलाचं उद्घाटन झालं. ते विलास देशमुखांनी केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना सांगून आपण ५५ उड्डाण पूल बांधले होते. त्यातले दोन पूल ठाण्यातील होते. विलास देशमुख उद्घाटन करायला आले. ते म्हणाले पूल बांधले युती सरकारने आणि त्याचं उद्घाटन मी करतो आहे. ‘दाणे दाणे पर लिखा है खानेवाले का नाम’. आता त्यात आपण काय करणार?” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली.
हेही वाचा : मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार ; फडणवीस म्हणाले, “त्यांनी जरूर उद्घाटन करावं, पण…”
“आम्हाला बाळासाहेबांनी कधीही श्रेयवादासाठी काम करायचं शिकवलं नाही”
“कोणीही कोणासाठी थांबत नाही. हे बदल सुरू असतात. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. त्यामुळे यात कोणी श्रेय घेण्यापेक्षा आपण लोकांना काय देतोय हे जास्त बघितलं तर आपल्याला फार समाधान मिळेल. आम्हाला बाळासाहेबांनी कधीही श्रेयवादासाठी काम करायचं शिकवलं नाही. श्रेय मिळो न मिळो लोकांचा फायदा ज्यात आहे ते काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे. म्हणून आमच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.