मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवताना विरोधकांना जोरदार टोले लगावले. “विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मेट्रो ३ च्या कामाला शुभेच्छा दिल्या. ते मंगळवारी (३० ऑगस्ट) कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
PHOTOS : … अन् मुंबईत प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली
एकनाथ शिंदे म्हणाले, “आज आपण पाहतो आहे की तो संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास जातोय. आपण लवकरच नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन करतो आहे. असे अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, त्यात अनेक विघ्नं आली. उद्या विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. अश्विनी भिडेंनी बरोबर योग साधून आज हिरवा झेंडा दाखवला. विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही.”
“साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल”
“प्रदुषण कमी होईल, साडेसहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, १७ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, वेळ वाचेल, साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल. याचा खूप मोठा फायदा आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“फडणवीसांनी सांगितलं की या कामावरील स्थगिती उठवली पाहिजे”
एकनाथ शिंदेंनी फडणवीस सरकारच्या काळाचा उल्लेख करत कौतुक केलं. ते म्हणाले, “युतीचं सरकार येऊन आज दोन महिने झाले आहेत. ३० तारखेलाच शपथविधी झाला होता. आम्हाला या बहुचर्चित मेट्रो चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे आभार मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, या कामावरील स्थगिती उठवली पाहिजे आणि दीर्घकाळ प्रलंबित हा प्रकल्प पुढे नेण्याचा आम्ही निर्णय घेतला.”
“अनेक लोकांनी विरोध केला, अडथळे आणले””
“फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं सुरू झाली. तसेच पाच वर्षात या प्रकल्पांनी मोठी प्रगती केली. मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उदाहरण मी देईन. मला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आपल्याला हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला. अनेकांनी अडथळे आणले,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“फडणवीसांकडे इच्छाशक्ती होती आणि मी त्याप्रमाणे काम केलं”
“या प्रकल्पाचा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या महाराष्ट्रातील भागाला होणार आहे. देवेंद्र फडणवीसांकडे इच्छाशक्ती होती आणि मग मी त्याप्रमाणे काम केलं,” असंही शिंदेंनी नमूद केलं.