अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं. यानंतर भाजपाने आपला उमेदवार माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (१७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “अंधेरी निवडणुकीत उमेदवार ऋतुजा लटकेंनीही आवाहन केलं होतं. रमेश लटके आमचा सहकारी आमदार होता. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत शरद पवार, राज ठाकरे, आमचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं.”
“भाजपा आणि शिवसेना युतीने उमेदवार दिला होता, पण…”
“एकंदरीत आपण महाराष्ट्रात ज्या आमदाराचा मृत्यू होतो त्याच्या घरातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला तर ती निवडणूक बिनविरोध होते. तसं बघायला गेलं तर भाजपा आणि शिवसेना युतीने उमेदवार दिला होता, त्याने जोरात तयारीही केली होती. त्यांना जिंकण्याचा विश्वासही होता. परंतु, सगळ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझी आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशीही चर्चा केली,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
“चर्चेनंतर आपली महाराष्ट्राची प्रथापरंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवार मागे घेत निवडणूक बिनविरोध केली,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.