मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार बेईमानी करून पाडणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यास जाणे शरद पवार यांनी टाळायला हवे होते. शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राची वाट लावली. राज्याची अस्मिता व स्वाभीमान गहाण ठेवला. त्या शिंदे यांचा सत्कार पवार यांनी करायला नको होता, अशी बोचरी टीका ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यावर शिंदे पक्षाच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

‘सरहद’ संस्थेच्या वतीने दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते मराठा साम्राज्याचे सरसेनापती ‘महादजी शिंदे महाराष्ट्र पुरस्काराने’ सत्कार करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सत्कारामुळे पवारांवर नाराज झाल्याची चर्चा आहे. तर पवार यांनी शिंदे यांच्या सत्काराला जाणे टाळायला हवे होते, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. ‘राजकारण आम्हालाही कळते. शिंदे ठाण्यातील राजकारणात उशिरा आले. ते राजकारणात आल्यानंतर ठाण्याची वाट लागली’, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.

राऊत यांच्या या टीकेवर शिंदे पक्षाचे मंत्री असलेल्या नेत्यांनी एकाचवेळी हल्लाबोल केला. ठाकरे गटाने केवळ राजकारण केले आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना पवार अनेककदा राज्याच्या हिताचा विचार करून भेटले आहेत. तर उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून राऊत यांनी राजकारण केले आहे, अशा शब्दात शिरसाट यांनी शरसंधान साधले. शिंदे यांनी ठाण्याचा खरा विकास केला आहे. राऊत हे शिवसैनिक नाहीत. ते पेपरवाले आहेत. त्यांच्या नावावर एक भ्रष्टाचाराचे प्रकरण नोंद आहे, अशी खरमरीत टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

Story img Loader