मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाला परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या दादा भुसे यांनी या निकालासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयानुसार आम्ही मेळावा कुठे घ्यायचा हे निश्चित करु असं म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात भुसे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी, “असा निर्णय न्यायालयाने केला असेल तर आपण त्याच्या अंमलबजावणीचं काम करतो. तो तपासून पाहिला जाईल आणि त्यानुसार मार्गक्रमण करु,” असं उत्तर दिलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना याच याचिकेबरोबरच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांची याचिका फेटाळण्यात आल्याने हा मोठा फटका मानला जात असल्याचा प्रश्न भुसे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भुसे यांनी, “फटका वगैरे काही नसतं. न्यायालयात दाद मागणं लोकशाहीत अभिप्रेत आहे. न्यायालयाला जे योग्य वाटलं ते निर्णय करत असतं,” असं म्हटलं आहे.

तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा मेळावा नेमका कुठे घेतला जाणार हे लवकरच ठरवलं जाईल असंही भुसे म्हणाले. “शिंदेसाहेब मेळावा कसा करायचा कुठे करायचा याबद्दल निर्णय घेतील तसा भव्य मेळावा होईल,” असं भुसे यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटाच्या मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करणार का या प्रश्नावर बोलताना भुसे यांनी, “शक्ती प्रदर्शन वगैरे काही भाग नसतो,” असं उत्तर दिलं.

पुढे बोलताना भुसे यांनी, “आताच्या घडीला शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंबद्दल आनंदचं, उत्साहाचं वातावरण आहे. शिंदेंच्या मेळाव्याला शिवाजी पार्क अपुरं पडलं असतं. शिंदे ज्या जागेची निवड करतील त्या ठिकाणी आनंदात, भव्यदिव्य दसरा मेळावा संप्पन होईल,” असंही सांगितलं.

Story img Loader