काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राहुल गांधी यांच्यावर भाजपा आणि मनसे पक्षाकडून टीका केली जात आहे. असे असतानाच आता शिंदे गटही राहुल गांधी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे. शिंदे गटाने आज (१९ नोव्हेंबर) मुंबईत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुंबईमध्ये आज शिंदे गटाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिंदे गटातील कार्यकर्त्यांसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मोर्चादरम्यान राहुल गांधी तसेच काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयजयकार करण्यात आला.
महाविकास आघाडीतून बाहेर पडावे
सावरकरांना भारत्नरत्न पुरस्कार द्यायला हवा, असे संजय राऊत म्हणत आहेत. आमचीही हीच भूमिका आहे. मात्र मागील अडीच वर्षांत सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा प्रस्ताव त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कधीही आणलेला नाही. त्यांना अडीच वर्षांत कधीच हे आठवले नाही का? संजय राऊत हे चार वेळा खासदार झालेले आहेत. मात्र त्यांनी संसदेतही कधी हा मुद्दा उपस्थित केलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रेम असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी दिले.