मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून गेले दोन दिवस मेळाव्यांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मराठवाडय़ातील आमदारांनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनासाठी मराठवाडय़ातून मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईत आले होते. शिवसेनेत आपल्यावर कसा अन्याय झाला आणि शिवसैनिकांच्या भल्यासाठी आपण कसे धाडस केले याचेच पालुपद मुख्यमंत्र्यांनी दोन्ही दिवस लावले होते. शनिवारी कुर्ला मतदारसंघात अशाच पद्धतीने शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
नक्की वाचा >> “जर मुलं सात वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश नऊ वाजता कामाला सुरुवात का करु शकत नाहीत?”
मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वतीने प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात गेले दोन दिवस शक्तिप्रदर्शन झाले. गुरुवारी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आमदार संजय शिरसाठ यांनी मेळावा आयोजित केला होता. शुक्रवारी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अशाच पद्धतीने शक्तिप्रदर्शन केले. दोन दिवसांच्या या शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही आमदारांनी आपापल्या मतदारसंघातून गाडय़ा भरून कार्यकर्ते मुंबईत आणले होते. उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात सत्तार हे राज्यमंत्री होते. शिंदे सरकारमध्ये पुन्हा आपली वर्णी लागावी, अशी सत्तार यांची इच्छा आहे. आमदार शिरसाठ यांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. ‘मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणूनच शिरसाठ आणि सत्तार यांनी हा सारा प्रताप केल्याचा आरोप शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.