मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिवसेनेच्या शिंदे गटाने आता मुंबई महानगरपालिकेत सक्रिय होण्याचे ठरवले आहे. महानगरपालिका मुख्यालयात येऊन पक्ष कार्यालयात घुसखोरी केल्यानंतर आता या गटाने मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात सक्रिय होण्याचे ठरवले आहे. त्याकरीता पाच जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पाच जणांमध्ये खासदार गजानन कीर्तीकर आणि राहुल शेवाळे यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> मुंबई : महानगरपालिका आयुक्तांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांना दिली केवळ एका मिनिटाची भेट
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून सर्व पक्षांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानेही महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाचे शिष्टमंडळ प्रथमच महानगरपालिका मुख्यालयात आले होते व त्यानंतर ते शिवसेना पक्ष कार्यालयातही गेले. उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांबरोबर मोठा वाद झाल्यानंतर पक्ष कार्यालय बंद करण्याची वेळ आली. शिंदे गटामुळे महानगरपालिकेच्या वर्तुळात मात्र खळबळ उडाली. आता या पक्षाने महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी संघनात्मक कार्याची रितसर जबाबदारी पाच जणांवर सोपवली आहे. यामध्ये शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, उपनेते राहुल शेवाळे, शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामेडी यांचा समावेश आहे.