मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेत अजित पवारांना संधी देताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले नव्हते. याबद्दल टीका सुरू झाल्याने अखेर शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे. प्राधिकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असून, शिंदे यांना वगळण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यानंतर शिंदे यांचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राधिकरणाच्या कामकाज पद्धतीनुसार संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश त्यात केला जातो. नगरविकास खात्याच्या मंत्र्यांचा समावेश याआधी त्यात नव्हता. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस गृहमंत्री या नात्याने त्यात होते. शिंदे यांच्या कार्यकाळात इर्शाळवाडी दुर्घटना घडली होती. तेव्हा ते अवघड चढण चढून बरेच अंतर भर पावसात पायी गेले होते. राज्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या अनेक नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांच्या वेळी शिंदे हे मदतीसाठी धावून गेले होते. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात त्यांचा समावेश असावा, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली होती. या मुद्द्यावर बरीच टीका टिप्पणी झाल्याने फडणवीस यांनी शिंदे यांचा समावेश प्राधिकरणात करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कोठेही आपत्ती आली, तर मी नेहमीच तेथे मदतीसाठी धावून जातो, प्राधिकरणातील समावेशाबाबत माहिती नाही, असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.