विधानसभेच्या अधिवेशनात काही विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना संबंधित विभागाचे मंत्रीच गैरहजर असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील प्रश्न ऐकण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित नसणं विधानसभा अध्यक्षांचा अपमान असल्याचं म्हणत टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. “जयंतराव असं का करता. मी अख्खा मुख्यमंत्री तुमच्या सेवेसाठी इथं बसलो आहे,” असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.
जयंत पाटील म्हणाले, “हा अध्यक्षांचा अवमान आहे. हे सर्व मंत्री हजर होईपर्यंत तुम्ही सभागृह तहकूब करा. त्याशिवाय यांच्यावर जरब बसणार नाही.” यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “जयंतराव असं का करता. मी अख्खा मुख्यमंत्री तुमच्या सेवेसाठी इथं बसलो आहे.”
धनंजय मुंडे म्हणाले, “या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर पुरवणी मागण्यांवर चर्चा व्हायला हरकत नाही. त्यांच्या सक्षमतेवर कुणाच्याही मनात शंका नाही. शंका असलीच तर त्यांच्या आजूबाजूला असू शकेल. मात्र, मुख्यमंत्र्यांवर कोणत्या कोणत्या गोष्टींचा भार देणार आहेत.”
“सभागृह तहकूब करा, मंत्र्यांनाही जाणीव होऊ द्या”
“शिक्षणमंत्र्यांचंही लिखाण काम त्यांनीच करायचं का? त्यामुळे १० मिनिटं सभागृह तहकूब करा. त्या मंत्र्यांनादेखील जाणीव होऊ द्या. या सदनाचा, अध्यक्षांचा आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांचे मंत्री अवमान करत असतील तर हे बरोबर नाही,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
नेमकं काय घडलं?
हसन मुश्रीफ सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, “चर्चेसाठी ग्रामविकासमंत्रीच नाहीत.” यावर जयंत पाटलांनी ग्रामविकासमंत्री आल्याशिवाय चर्चा कशी करणार असा सवाल केला. त्यानंतर अजित पवारही उभे राहिले आणि म्हणाले, “अध्यक्ष महोदय, आपण नेहमीच नियमावर बोट ठेऊन चालतात. इथं स्वतः विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे आहेत. विभाग ठरवून देण्यात आले आहेत, ग्रामविकास विभागाची चर्चा आहे आणि या विभागाचे मंत्रीच आज हजर नाहीत.”
“मुख्यमंत्री आहेत म्हणून खात्याच्या मंत्र्यांनी हजर राहायचं नाही का?”
यावर राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आहेत, असं मत मांडलं. यावर अजित पवार आक्रमक होत मुख्यमंत्री आहेत, म्हणून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी हजर राहायचं नाही का? उत्तर कोण देणार आहे? असे सवाल केले. “आम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून तिथं बसून कामं केली आहेत. आपण त्यावेळी इकडे होता. त्यावेळी त्या त्या विभागाचे मंत्र्याला किंवा राज्यमंत्र्याला हजर राहायला लावायचो.” यावर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी संबंधित मंत्र्यांना बोलवण्यात येत आहे, असं म्हटलं.
“आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहात”
अजित पवार पुढे म्हणाले, “आदिवासी मंत्री गावित आहेत, परंतु शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व गिरीश महाजन गैरहजर आहेत. हे काय आहे, वरच्या सभागृहाने सांगायचं खाली आहेत आणि खालच्या सभागृहाने सांगायचं वर आहे. आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहात. आम्ही सत्तेत होतो तेव्हा मी स्वतः खालच्या सभागृहात थांबायचो आणि शंभुराजे वरच्या सभागृहात थांबायचे.”