सौरभ कुलश्रेष्ठ, लोकसत्ता
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारून शिवसेनेची साथ सोडण्यास कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हा एक प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूत्ववादी मतदारांचा पगडा असल्याने भाजपच्या मदतीशिवाय विजय अशक्य असल्यानेच खासदारपुत्राचे राजकीय भवितव्य हाही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत निर्णायक मुद्दा ठरल्याचे मानले जात आहे.
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवले आणि अडीच लाख मतांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही श्रीकांत शिंदे यांनी ३ लाख ४४ हजार मतांनी विजय मिळवला. या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवारास चांगली लढतही देता आलेली नाही.
कल्याण डोंबिवली ते अंबरनाथ, उल्हासनगर या पट्टय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हिंदूत्वाचा प्रभाव आहे. कल्याण-डोंबिवली तर संघाचा बालेकिल्ला मानला जातो. अशा हिंदूत्ववादी विचारांचा पगडा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मदतीशिवाय श्रीकांत शिंदे यांचा विजय शक्य नाही. आतापर्यंत दोन वेळा खासदार झालेले श्रीकांत शिंदे हे भाजपबरोबर जाऊन तिसऱ्या वेळीही खासदार होतील. पुढच्या निवडणुकीत खासदार झाल्यावर त्या वेळीही देशात भाजप सरकारच सत्तेवर येईल आणि त्या वेळी श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळेल. कदाचित त्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असे समीकरण मांडण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे-कल्याण या आपल्या प्रभावाखालील भागात हिंदूत्ववादी मतदारांचे गणित आणि त्यातून खासदारपुत्राचे राजकीय भवितव्य यांचाही विचार शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताना केल्याचे समजते.
मतदारसंघातील गणित
कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण व मुंब्रा कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ सोडला तर बाकी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदूत्ववादी मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळेच चार मतदारसंघांत भाजप-शिवसेनेचे आमदार आहेत. तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील हे आमदार असले तरी ते शिवसेनेच्या उमेदवाराला अगदी थोडक्या मतांनी पराभूत करून निवडून आले. शिवाय मनसेही पूर्वीपासून हिंदूत्वाशी जवळीक ठेवणारा असाच राहिला आहे. आता तर मनसेनेही हिंदूत्ववादी भूमिका घेतली आहे.