मुंबई : शिवसेना आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव शिंदे यांनी फेटाळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे बोलताना बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन बोलण्याचे आवाहन केले होत़े  तसेच शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देऊन बघावा, अशी चर्चा झाली होती.

एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटक पक्षांनाच झाला.  शिवसैनिक भरडला गेला. शिवसेनच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे व शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली़  

महाविकास आघाडी सरकार हे शिवसेनेच्या मूळ हिंदूत्ववादी विचारसरणीशी सुसंगत नसल्याने पक्ष आणि शिवसैनिकांना ते मान्य नाही. शिवाय या सरकारमधील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना झालेली अटक तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारची आणि सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेची प्रतिमा डागाळत आहे. पक्षाला बरीच टीका सहन करावी लागत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

शिवसेना आणि अपक्ष बंडखोर आमदार

एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, नितीन देशमुख (हे नागपूरमध्ये परतले, पण पत्रावर स्वाक्षरी आहे), किशोर पाटील, श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, यामिनी जाधव, सुहास कांदे, डॉ. बालाजी किणीकर, प्रदीप जयस्वाल,  संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे,  भरत गोगावले, संदीपान भूमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, बालाजी कल्याणकर, प्रताप सरनाईक,  ज्ञानराज चौगुले, संजय गायकवाड,  महेश शिंदे, राजेंद्र पाटील, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, चिमणराव पाटील,  शहाजी पाटील, गुलाबराव पाटील, योगेश कदम, बच्चू कडू (प्रहार), राजकुमार पटेल (प्रहार), नरेंद्र भोंडकर (अपक्ष), मंजुळा गावित (अपक्ष, शिवसेना सहयोगी), चंद्रकांत पाटील (अपक्ष)

सुनील प्रभू नव्हे, भरत गोगावले मुख्य प्रतोद

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी सकाळी शिवसेना आमदारांना बैठकीचे पत्र पाठवत हजर न राहिल्यास अपात्रतेच्या कारवाईचा इशारा दिला होता. ते पत्र जाहीर होताच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यास समाजमाध्यमांद्वारे हरकत घेतली. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांनी त्याबाबतचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवले. त्यामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षावर कोणाचे नियंत्रण हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिंदे म्हणाले..

’ गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला़

’ घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीरपणे खच्चीकरण होत आह़े

’ पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक

’ महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेच़े