मुंबई : माणुसकीचा धर्म सोडणार नाही!काश्मीर दौऱ्याबद्दलच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे उत्तर पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या परतीसाठी राज्य सरकारने मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील तेथे गेले. यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना समाचार घेतला.

‘‘काश्मिरात २६ पर्यटकांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून मारलं. धर्म विचारून गोळ्या घातल्या. त्यात काही मराठी पर्यटकही आहेत, हे कळल्यावर स्वस्थ बसणे अशक्यच होते. पाठोपाठ तिथे हजारो मराठी नागरिक अडकल्याचे समजले. महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांकडून त्याबाबत फोन येऊ लागले. राज्य सरकारची यंत्रणा तातडीनं कामाला लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीनगरला पोहोचून मदतकार्य सुरू केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पथकही त्याचदिवशी रात्री श्रीनगरला पोहोचले होते. त्यांच्याकडून अडकलेल्या पर्यटकांबाबतची माहिती मिळाली. तातडीने निर्णय घेऊन मी श्रीनगरला विमाने घेऊन गेलो. काही कार्यकर्ते, डॉक्टरांचे पथकही घेऊन गेलो, ’’ अशा शब्दांत शिंदे यांनी काश्मीरला जाण्याचे कारण स्पष्ट केले.

पहलगाममधील परिस्थितीबाबत ते म्हणाले, ‘‘पहलगाममध्ये जे घडलं, त्याची अनेक वृत्तांकने लोकांनी दूरचित्रवाणीवर बघितली असतील, वृत्तपत्रांमधून वाचली असतील. पण तिथे काय परिस्थिती असते, हे शब्दांतून सांगण्यासारखे नाही. घाबरलेले, गोंधळलेले मराठी पर्यटक गोळा झाले होते. त्यांच्या डोळ्यांत भय होते. ज्यांनी आपलं माणूस गमावलं होतं, त्यांचे दु:ख सांत्वनापलीकडचे आहे. तरीही मी एक सख्खा भाऊ या नात्याने धीर देण्याचा प्रयत्न केला. घरी जायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे होताच. म्हणून तातडीने हालचाली करून चार विमानांची सोय केली आणि जवळपास ८४५ मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणले. अगदी वर्ध्याला जाण्यासाठी वाहनांची सुविधाही करून दिली,’’ असे शिंदे म्हणाले.

आपत्तीग्रस्तांचा आक्रोश ऐकू येतो

‘आपत्तीग्रस्तांचा आक्रोश मला लांबवर ऐकू येत असतो. दालनातील खुर्चीत बसून आदेश सोडण्याचा माझा स्वभाव नाही,’ असे सांगताना शिंदे यांनी आपल्यात ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या समाजकारणाचे बाळकडू’ असल्याचे म्हटले. चिपळूण असो, महाड असो, केरळ असो किंवा उत्तराखंड असो जिथे आपत्ती तिथे मी मदतीसाठी सदैव तत्पर असतो. कोल्हापूरच्या पुरात, कोकणातल्या वासिष्ठी नदीचा प्रकोप झाल्यावर, इर्शाळगडावर दरड कोसळून अवघी वस्ती नष्ट झाली तेव्हा प्रत्येक वेळी हा एकनाथ तातडीनं तिथे पोहोचला. इर्शाळगडावर दोन अडीच तास चिखल तुडवत तिथे पोहोचावे लागले. कोविडच्या काळात तर जिवाची पर्वा न करता पीपीई किट घालून मी रुग्णांच्या गाठीभेटी घेत होतो. आपत्तीच्या वेळी कपड्यांची इस्त्री सांभाळत बसून राहणे, मला जमत नाही,’ असे ते म्हणाले.

‘भारताच्या आत्म्यावरचा अखेरचा हल्ला’

पहलगामच्या दुर्घटनेत आपण काही भावंडे गमावली आहेत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. माझ्या भावपूर्ण संवेदना त्यांच्याप्रति आहेत. निरपराध नागरिकांचं हत्त्याकांड घडवणाऱ्यांना आयुष्यभराचा धडा मिळेल. दहशतवादाने थरथर कापणारा भारत आता उरला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातूनही हल्लेखोरांना शोधू आणि त्यांच्या सूत्रधारांनी कल्पना केली नसेल अशी शिक्षा त्यांना देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. हा इशारा लवकरच सत्यात येईल आणि पहलगामचा हा भारताच्या आत्म्यावरचा हल्ला अखेरचा ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.