मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना पुढील उपाचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेने मुंबईला आणण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी संजय शिरसाट हे प्रमुख आमदारांपैकी एक आहेत. शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होतं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत पाठवण्यात आलं. मात्र शिरसाट यांना औरंगाबादमध्येच उपचार घेण्याऐवजी मुंबईला प्राधान्य का दिलं यासंदर्भात त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिग्मा रुग्णालयामध्ये डॉ. टाकळकर यांनी शिरसाट यांच्यावर उपचार केले. शिरसाट यांना नेमका काय त्रास होत आहे यासंदर्भात बोलताना टाकळकर यांनी, “त्यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना छातीमध्ये दुखत होतं तसेच अस्वस्थ वाटत होतं. तसेच त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यांना बीपी कमी करण्याची औषध देण्यात आली. तसेच त्यांची प्रकृती स्थीर करण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्यात आले,” अशी माहिती दिली. तसेच यापूर्वी त्यांच्यावर एन्जीओप्लास्टी सुद्धा झाली असल्याचं डॉक्टरांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.

सकाळी आठ ते सव्वा आठदरम्यान शिरसाट यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला पाठवण्यात आलं. पावणे नऊच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर दाखल झाले असून त्यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. शिरसाट पुढील उपचारांसाठी मुंबईला का गेले यासंदर्भातील प्रश्नावर, “कार्डीओलॉजीकल तपासणीसाठी मुंबईला जाण्याची इच्छा होती,” असं टाकळकर यांनी सांगितलं. प्रकृती स्थिर झाल्यानंतरच शिरसाट यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने प्रवासाची परवानगी डॉक्टरांनी दिली. या प्रवासामध्ये एक डॉक्टरही शिरसाट यांच्याबरोबर एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये होते असंही टाकळकर यांनी सांगितलं.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. शिंदेंनीच शिरसाट यांना मुंबईत येऊन उपचार घेण्यासंदर्भात विचारणा केली. शिंदे यांनी स्वत: कार्डीओलॉजिस्ट असलेल्या डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पर्कार यांच्यासोबत चर्चा करुन शिसराट यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात चर्चा केल्याचंही समजतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde supporter mla sanjay sirsat heart attack why he chose mumbai over auragabad for treatment cm call scsg