ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. वडील ठाकरे गटात, तर मुलगा शिंदे गटात केल्याने तर्कवितर्कही लावले जात आहेत. अशातच भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश का केला यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उत्तर दिलं. ते सोमवारी (१३ मार्च) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि इकडे आपला हा कार्यक्रम सुरू आहे. भूषण देसाई यांचं मी शिवसेनेत स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार या राज्यात स्थापन झालं. त्यांची भूमिका आणि विचार आम्ही पुढे नेण्याचं काम करत आहोत. त्यामुळे या महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून तालुका-तालुक्यातून कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत.”
“आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले”
“आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले. तसेच हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर काम करू लागले. सरकार स्थापन झाल्यानंतर हजारो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाठिंबा दिला,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
व्हिडीओ पाहा :
“बाळासाहेबांबरोबर काम करणाऱ्या नेत्यांचाही आम्हाला पाठिंबा”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेबांबरोबर काम करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही पाठिंबा दिला, सोबत आले. रामदास कदम, अडसुळ, प्रतापराव जाधव व इतर मान्यवर ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं ते सोबत आले. ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे.”
“…म्हणून भूषण देसाईंनी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला”
“ही सगळी कामं, बाळासाहेबांची भूमिका याचा विचार करून भूषण देसाईंनी मला सांगितलं की, तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्यांनी काम करणाऱ्या लोकांबरोबर राहायचं असा निर्णय घेतला. विकासाभिमूख निर्णय घेणारं सरकार असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.