मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी रात्री लखनौ विमानतळावर दाखल झाले. शिंदे रविवारी अयोध्येला जाऊन रविवारी दुपारी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन सायंकाळी शरयूतीरी महाआरती करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रविवारी रात्री भेट घेऊन चर्चाही करणार आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.
त्यांच्यासमवेत ज्येष्ठ भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संजय कुटे आदी नेतेही सहभागी झाले आहेत. शिंदे यांचे लखनौ विमानतळावर ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपचे उत्तर प्रदेशमधील पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते.
शिंदे हे दुपारी १२ वाजता श्रीरामांचे दर्शन घेतील. ते हनुमान गढी येथेही जाऊन दर्शन घेणार असून भव्य राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही करणार आहेत. शिंदे हे अयोध्येत संत-महंतांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेणार आहेत.
त्यानंतर रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशातील महाराष्ट्र भवन आणि मुंबईतील उत्तर भारतीयांसह अन्य मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत.या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मोठय़ा संख्येने शिवसेना कार्यकर्तेही रेल्वेगाडय़ांनी अयोध्येत पोहोचले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. चलो अयोध्या. प्रभू राम के सन्मान में, हिंदूुत्व का तीर कमान, असे फलक लखनौ व अयोध्या परिसरात लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह आणि भगव्या पताकांनी परिसर सजविण्यात आला आहे.