कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टला आव्हान देत स्वतंत्र चूल मांडून मंदिरात वेगळी दानपेटी आणि देणगीसाठी पावत्या छापणाऱ्यांना धर्मदाय आयुक्तांनी चांगलाच चाप लावला आहे.
देवस्थान वगळता अन्य कोणालाही मंदिरात दानपेटी ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करतानाच वेगळी दानपेटी हलविण्याचा आदेश दिला आहे.
एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते  अनंत तरे हे असून, या ट्रस्टच्या विरोधात काही जणांनी वेगळी चूल मांडली आहे. अधिकृत विश्वस्त मंडळाच्या विरोधात गेलेल्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात दानपेटी ठेवली तसेच देणगीसाठी पावत्याही छापल्या होत्या.  
धर्मदाय आयुक्तांकडे आव्हान
महादू देशमुख यांनी तरे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळाला धर्मदाय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. उपधर्मदाय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीत मंदिराचे देवस्थान हेच अधिकृत असल्याचा  तरे यांचा दावा मान्य करण्यात आला.  
तसेच मंदिरात बसविण्यात आलेली दानपेटी १५ दिवसांत काढण्याबरोबरच देणग्या वसूल करण्यावर या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.
गुंडगिरी करून देवस्थानचा कारभार हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याचे मत अनंत तरे यांनी व्यक्त केले.