मुंबई : दिल्लीमधील ७४ वर्षीय व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, धमकावून त्याच्याकडून १८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या माहिलेचा मालवणी पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी महिलेच्या साथीदाराचाही सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार ७४ वर्षांचे असून ते मुलगा आणि सुनेसोबत राहतात. त्यांच्या पत्नीचे २०१५ मध्ये निधन झाले होते. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित त्यांचा व्यावसाय आहे. त्यांची मुलगी कॅनडामध्ये राहते. ते केस कापण्यासाठी सलूनमध्ये जात होते. त्यावेळी तेथे काम करणारा पवन वर्माला ते आपले दुःख सांगायचे. पत्नीच्या मृत्युमुळे आपल्याला एकटे वाटत असल्याचे तक्रारादाने सांगितले. त्यावेळी वर्माने एखादी महिला सोबती मिळवण्याचा सल्ला तक्रारदाराला दिला. त्याने त्यांना रेश्मा ऊर्फ पन्नू सिंह हिचा मोबाइल क्रमांक दिला. रेश्मा महिला सोबती मिळवून देण्यात मदत करेल, असे त्याने सांगितले. सिंहने तक्रारदाराला काही महिलांची छायाचित्रे दाखवली आणि काहींशी भेटीही घडवून आणली, पण त्यांना कोणीच पसंत पडले नाही. मार्च २०२३ मध्ये सिंहने तक्रारदाराची ओळख एका महिलेसोबत करून दिली. ती विवाहित असून मालवणीत राहत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदाराला तिचे छायाचित्र आवडले. त्यानंतर मे २०२३ मध्ये ते दिल्लीतून मुंबईला खास तिला भेटायला आले. मालाड येथील एका रिसॉर्टमध्ये ते तिला भेटले.त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि नंतर त्यांनी गोव्यातील एका हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची व्यवस्था केली. तिथे ते दोघेही भावनिकदृष्ट्या जवळ आले. त्यानंतर ते मोबाइलवरून वारंवार बोलू लागले आणि महिलेने तक्रारदाराकडून पैशांची मागणी सुरू केली. पहिल्यांदा तिने तक्रारदाराकडे ४ कोटी रुपयांची सदनिका मागितली. पण तक्रारदाराने एवढी महाग सदनिका घेणे शक्य नसल्याचे सांगितले. नंतर, एकदा तिने त्यांना मालाड पूर्व येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी दोघेही एकमेकांसोबत होते. तेव्हा महिलेने दिंडोशी पोलिसांकडे तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केली.
यानंतर तिने तक्रारदाराला धमकावण्यास सुरुवात केली आणि एका वर्षात त्यांच्याकडून १८ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यावेळी एका अज्ञात महिलेचा तक्रारदाराला दूरध्वनी आला. त्याने आरोपी महिलेने त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचे पुरावे तिच्याकडे असल्याचे सांगितले. ती महिला आपली मैत्रीण असून तिच्या संवादाच्या काही ध्वनीपीत त्या अज्ञात महिलेकडे होत्या. त्या ऐकल्यानंतर आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी सर्व पुरावे मालवणी पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.