आघाडीला चौथ्यांदा संधी देण्याचे महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपता संपता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या निर्णयांची जंत्री मांडत, काही नव्या जुजबी घोषणांची खैरात करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच शुभारंभ केला. सर्व समाजाला बरोबर घेऊन राज्याचा सर्वागीण विकास साधण्यासाठी जनतेने चौथ्यांदा आघाडीलाच संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी विधान परिषदेत केले.
विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आणि अन्य सदस्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांचा प्रश्न, घरांची समस्या, राज्यात वाढते नागरीकरण, त्यातून उद्भवणाऱ्या नव्या प्रश्नांचा वेध घेणारा अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर उत्तर दिले. राज्यात काँग्रेस आघाडीचे गेली १५ वर्षे सरकार आहे. गेल्या दहा वर्षांत राज्याचा जेवढा विकास झाला, तसा या पूर्वी कधीही झाला नाही, असा दावा त्यांनी केला. कुणी कितीही टीका केली, तरी आर्थिक विकासात देशात महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.
आघाडी सरकारच्या कारकीर्दीतील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. त्याची जाणीव करून देत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रस्तावावर सरकारची भूमिका मांडताना निवडणूक प्रचाराचेच भाषण केले. सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन, सर्व समाजाला बरोबर घेऊन, राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने चौथ्यांदाही आघाडीलाच संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक घोषणा
* खासगी गृहनिर्माण संकुलात गरिबांसाठी २० टक्के घरे राखीव ठेवणे बंधनकारक
* कुलाबा ते सीप्झ भुयारी मेट्रो मार्गाचे लवकरच काम सुरू करणार
* मुंबईत किनारी मार्गाचा प्रस्ताव केंद्राला सादर
* ठाणे-कल्याण-भिवंडी मोनोऐवजी मेट्रो रेल्वे सुरू करणार
* एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व शहरांतील जुन्या इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास
* दोन हजार सालापर्यंतच्या झोपडय़ांना कायदेशीर संरक्षण
* भाडेतत्त्वावरील घरांऐवजी परवडणाऱ्या दरातील मालकीहक्काच्या घरांची योजना