मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबद्दल तीब्र चिंता व्यक्त करतानाच अशा गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले. निवडणुकीत राजकीय वातावरण गढूळ करणाऱ्या कोणाचीही गय करु नका, अशा कठोर सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र, झारखंड आणि त्यांच्या शेजारील राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच अन्य उच्चाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दूरदृश्य प्रणाली माध्यमातून झालेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम, अतिरिक्त आयुक्त किरण कुलकर्णी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते.

हेही वाचा :महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंनी दिली वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

बैठकीदरम्यान राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील वाढत्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. अशा घटनांमुळे राज्यातील निवडणुकीचे वातावरण दूषित होत असून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया प्रेरित गुन्हयांवर कडक नियंत्रण ठेवण्याचे आणि अशा गुन्हयांत निष्पक्ष राहून कोणालाही पाठीशी न घालण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. चार दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्येही काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या संघर्षात भाजपच्या एका नेत्यांने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल केलेल्या वाद्ग्रस्त वक्तव्यावरुनही राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर आयोगाने राज्यातील कायदा सुव्यस्था बिघडणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचनाही महासंचालकाना केल्याचे समजते.

हेही वाचा :श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

निवडणूक आयोगाने निवडणूक काळात राज्यांमध्ये रोकड, मद्या, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू आणि इतर मोफत वस्तूंसह प्रलोभनांचा प्रवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे कठोर आदेश यावेळी दिले. राज्याच्या सीमेवर बंदोबस्त वाढवा, तपासणी वाढवा तसेच सतर्क राहून शेजारील राज्यातून पैसे, मद्या वा मौल्यवान वस्तू राज्यात येणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.

मोठ्या प्रमाणात रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत ३४५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून १७५ कोटी रुपये आणि झारखंडमधून ११४ कोटी रुपये जप्त करण्यात आले असून उर्वरित रक्कम पोटनिवडणूक होत असलेल्या राज्यांमधून जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून जप्त केलेली रक्कम ही २०१९च्या निवडणुकीत जप्त केलेल्या रक्कमेच्या २.३ पट पट अधिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission of india order maharashtra dgp rashmi shukla strict action on political crimes css