मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असनाताही मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षां’वर होत असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक ‘वर्षां’ बंगल्यावर पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे मंत्री, आमदार तसेच नेतेही उपस्थित होते. या बैठकीवरून वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. देशभरात आचारसंहिता लागू होऊन दोन आठवडे उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थांनावर सतत राजकीय बैठका होत आहेत. हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे. राज्य निवडणूक अधिकारी जागे आहेत का, अशी विचारणा सावंत यांनी केली होती.

हेही वाचा >>>सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा

त्याची दखल घेत आयोगाने लगेच मुंबई शहर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रवि कटकधोंड यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव अमोल शिंदे आणि विशेष कार्यअधिकारी व मुलाखत कक्षाचे प्रमुख नितीन दळवी यांना नोटीस बजावत या बैठकीबाबतचा खुलासा मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेतली असून सबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी दिली. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission show cause notice to chief minister regarding political meetings amy
Show comments