निवडणुकीच्या रणधुमाळीवर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी नेमण्यात येणारे निरीक्षक आपापली कामे सोडून मौजमजाच करीत असतात. अशा काही निरीक्षकांच्या ‘लीलां’ची गंभीर दखल घेत आयोगाने शिस्तीचा बडगा उगारला आहे. या वेळी निवडणूक निरीक्षकांनाही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परिणामी आजवर पंचतारांकित सुविधा उपभोगणाऱ्या निरीक्षकांना या वेळी चक्क शासकीय विश्रामगृहातून कामकाज करावे लागत आहे. मात्र या निरीक्षकांची खपामर्जी नको म्हणून त्यांची ‘उत्तम बडदास्त’ ठेवण्याच्या सूचना अनेक जिल्हा प्रशासनांनी दिल्या आहेत.
निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि निवडणूक यंत्रणेला कधी ‘तूप पोळी’ तर कधी ‘वडा पाव’ मिळतो. मात्र निवडणूक निरीक्षकांची मात्र चंगळ असते. मुंबई असो वा गडचिरोली, या निरीक्षकांची बडदास्त ठेवली जात असे. यंदा मात्र या निरीक्षकांवर आयोगाने शिस्तीचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आपणही अडचणीत येऊ नये या दृष्टीने काही जिल्हा प्रशासनांनी आयोगाच्या आदेशाप्रमाणेच निरीक्षकांना सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी मात्र निरीक्षकांशी ‘पंगा’ नको म्हणून त्यांची ‘बडदास्त’ ठेवण्याची खबरदारी घेतली जात आहे.
राज्यात यंदा प्रत्येक मतदारसंघासाठी दोन निरीक्षक आणि जिल्ह्य़ासाठी कायदा सुव्यवस्थेसाठी एक आणि मतदार जागृतीसाठी एक असे निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या निरीक्षकांसाठी वाहन, निवास, दूरध्वनी, इंटरनेट, मोबाइल अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईत दाखल झालेल्या निरीक्षकांची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली असून त्यांना आयोगाच्या निदेशाप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत राजकीय पक्ष आणि माध्यमांचे नेहमीच निरीक्षकांवर लक्ष असते. त्यामुळे उद्या एखाद्या निरीक्षकाबाबत काही बातमी आली तर आमच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. त्यामुळे आयोगाच्या आदेशाप्रमाणेच सुविधा देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काही निरीक्षकांनी आपल्या मित्रांच्या घरी मुक्काम ठोकला आहे.
मुंबईबाहेर मात्र या निरीक्षकांची खपामर्जी नको म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून त्यांची खास खबरदारी घेतली जात आहे. या निरीक्षकांसाठी आलिशान निवासस्थानाबरोबरच त्यांच्या आदरातिथ्यामध्ये कसलीही कमतरता राहू नये याची काळजी घेतली जात आहे. हे निरीक्षक राहात असलेल्या निवासस्थानी चहा, शीतपेये आणि ताज्या फळांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान निरीक्षकांना थकवा जाणवू नये यासाठी काजू, बदाम, पिस्ता, चॉकलेट, चीज स्प्रेड आदी गोष्टीही सढळ हस्ते देण्यात येत आहेत.