ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीवर विभाजनाचे सावट असल्याने सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १६० पैकी १२० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २२ तसेच शिवसेना, भाजप आणि मनसेला १८ जागा मिळाल्या आहेत.
ठाणे जिल्हा नियोजन समितीची ४० जागांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांत जिल्ह्य़ाचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही समिती अल्पजीवी ठरण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे मत होते. याच पाश्र्वभूमीवर सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांची बैठक पार पडली असून त्यामध्ये ४० जागांवर वाटाघाटी करण्यात आली. महापालिका मतदारसंघातून २६ सदस्य निवडले जाणार असून त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी सात, काँग्रेसला चार, भाजप आणि बहुजन विकास आघाडीला प्रत्येकी तीन आणि मनसेला दोन जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघातून १२ सदस्य निवडले जाणार असून त्यामध्ये शिवसेनेला तीन, भाजपला दोन, राष्ट्रवादीला पाच, बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तसेच नगर परिषदेच्या मतदारसंघातून दोन सदस्यांची निवड होणार असून त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या वतीने नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, राष्ट्रवादीतर्फे खासदार संजीव नाईक, हनुमंत जगदाळे, काँग्रेसकडून बाळकृष्ण पुर्णेकर, मनसेतर्फे सुधाकर चव्हाण, भाजपतर्फे संजय केळकर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा