अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आता त्या निमित्ताने होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. न्यू जर्सी येथे झालेल्या ९०व्या मराठी नाटय़संमेलनाच्या खर्चाचा तपशील वारंवार मागूनही तो पुरवण्यात आला नाही. तसेच या संमेलनाला असलेल्या उपस्थितांची तपशीलासह यादीही दिलेली नाही, असा आरोप करत नाटय़निर्माता संघाने नांदी केली आहे. मात्र नाटय़परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तीन वर्षांनी हे आरोप करणे हास्यास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत नाटय़संमेलन घेण्यात येऊ नये, अशा प्रकारचे लेखी पत्र धर्मादाय आयुक्तांनी नाटय़ परिषदेला पाठवले होते, असे कळते. मात्र तरीही या पत्राची दखल न घेता नाटय़संमेलन न्यू जर्सी येथे घेण्यात आले. संमेलन झाले ही गोष्ट अभिमानाची आहे. मात्र या संमेलनाला कोण कोण आले, त्यापैकी किती लोकांचा खर्च नाटय़परिषदेने केला होता, एकूण खर्च किती झाला, याबाबतचा तपशील अद्याप मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत नाटय़निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांना विचारले असता, अशा प्रकारची पत्रे नाटय़निर्माता संघाने पाठवली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, मोहन जोशी यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. तसेच या सर्व खर्चाची कागदपत्रे परिषदेच्या कार्यालयात अजूनही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, न्यू जर्सीच्या नाटय़संमेलनाच्या खर्चाची यादी नाटय़परिषदेने २०१० या वर्षांत अनेकदा मागितली होती. मात्र त्याला परिषदेकडून कोणतेही उत्तर आले नाही. नाटय़परिषदेने एक यादी पाठवली होती. मात्र त्या यादीतील अनेक नावांचा आणि नाटय़सृष्टीचा दूरदूपर्यंत काहीच संबंध नव्हता. आता नाटय़परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक होत असून त्यात त्या कार्यकारिणीतील अनेक जण उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारांनी हा विचार करावा, असे जाधव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा