लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आगामी अधिसभा निवडणुकीसाठी नुकतीच प्राचार्य, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विभागप्रमुख या मतदारसंघासाठीची अंतिम मतदारयादी जाहीर केली. अधिसभेवरील संलग्न महाविद्यालयातील १० शिक्षक आणि विविध विद्याशाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकी २ प्राध्यापकांच्या मतदारसंघाची निवडणूक येत्या जून महिन्यात घेण्यात येणार आहे.
प्रत्येक विद्याशाखेच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक बुधवार, २४ मे रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील व्यवस्थापन परिषदेच्या दालनात पार पडली. सदर बैठकीत विद्याशाखेच्या आरक्षण सोडतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पुढील प्रक्रियेसाठी कार्यवाही सुरू आहे. पुढील आठवड्यात ही सोडत काढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… सशुल्क झोपडी अडीच लाखांत! शासन निर्णय जारी
संलग्न महाविद्यालयातील शिक्षक मतदारसंघातून अधिसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिक्षकास १५ वर्षांपेक्षा कमी अध्यापनाचा अनुभव नसावा. प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन प्राध्यापकांपैकी एक प्राध्यापक हा अनुसूचित जाती – जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, किंवा इतर मागासवर्गीय गटातील असेल. प्रत्येक विद्याशाखेचे आरक्षण हे चिठ्ठी टाकून काढलेल्या सोडतीद्वारे ठरविण्यात येणार आहे.